मच्छिमारांना सुधारित निकषांनुसार योग्य ती भरपाई देणार- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी केले़. सोबत एलईडी मासेमारी बंदीसाठी शासन कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले़.

अस्लम शेख यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी रविवारी दापोली तालुक्यातील हर्णे बंदर, बाणकोट आणि केळशी या भागांना भेट देऊन तेथील मच्छिमार बांधवांशी चर्चा करुन बोटींच्या नुकसानाबाबत माहिती घेतली़. याबाबतचे पंचनामे करताना मच्छिमार बांधवांच्या असणार्‍या विमा दाव्यांवर परिणाम होणार नाही अशा पध्दतीने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या़. यावेळी दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार हे या दौर्‍यात त्यांच्यासमवेत होते़. केळशी येथील खाडीमधल्या गाळाचा उपसा लवकरात लवकर करण्यात यावा याबाबतही त्यांनी सर्व अधिकार्‍यांना सूचना केल्या़.

मच्छिमार बांधवांच्या डिझेल परताव्याबाबत शासनाने गतिमान पद्धतीने काम केले असून गेल्या पाच वर्षात थकीत राहिलेली रक्कम डिसेंबर 2019 पुर्वी पर्यंतचा बॅकलॉग भरत सर्वांना अदा केली असल्याचे शेख यांनी सांगितले़. तसेच सर्व मच्छिमार बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही शेख यांनी नागरीकांशी चर्चा करताना सांगितले़.