EVERGREEN सुनील बर्वे

237

>> वरद चव्हाण

अभिनेते सुनिल बर्वे. रोज न चुकता 10 किमी. धावणे, शुद्ध शाकाहार ही त्यांच्या फिटनेसची गुरुकिल्ली.

हिंदी सिनेसृष्टीमधील एव्हरग्रीन हीरो म्हटल्यावर आपल्या डोळय़ांसमोर देव आनंद, जितेंद्र, ऋषी कपूर येतात ना? असाच एक एव्हरग्रीन हीरो आपल्या मराठी सिनेसृष्टीतसुद्धा आहेच की! अहो, कोण म्हणून काय विचारता? आपला एव्हरग्रीन हीरो म्हणजेच सुनील बर्वे. खरंतर सुनीलकाकांना मी लहानपणापासून ओळखतो. आता जरी ते काका दिसत नसले तरी त्यांनी मला लहानपणापासून बघितलंय म्हणून एक आदर म्हणून म्हणा, त्याशिवाय काका म्हटल्यावर माणूस आपल्या जवळचा वाटतो नाही का? सुनीलकाकांनी माझे बाबा (विजय चव्हाण) यांच्या बरोबर ‘मोरूची मावशी’ या नाटकात काम केलंय. याशिवाय मी स्वतः त्यांच्याबरोबर ‘श्रीमंत दामोदरपंत’ या चित्रपटात काम केलंय. त्यातही ते माझे काकाच होते. त्यांच्या बरोबर काम करतानाच आपल्याला त्यांचा चेहरा आणि ऑटिटय़ूडमध्ये असणाऱया फ्रेशनेसची जाणीव होते.

सुनील बर्वेंचे पदार्पण 1985ला ‘अफलातून’ या नाटकातून झाले. टिपिकल ब्राह्मण कुटुंबात वाढलेल्या सुनीलजींच्या घरातच व्यायामाचे वेड होते. बाहेरचे न खाणे अशा संस्कारात त्यांचे बालपण गेले. त्याशिवाय बर्वे कुटुंब अत्यंत धार्मिक होते. रोज सकाळी देवाच्या पूजेबरोबरच व्यायाम हा झालाच पाहिजे अशी त्यांच्या वडिलांची शिकवण होती. त्यामुळे पूजा झाली रे झाली की, सूर्यनमस्कार घातलेच पाहिजेत असा नियमच होता. त्यांच्या काकांची शरीरयष्ठाr खूप मस्त होती. घरातली सगळी लहान मुलं काकांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम शिकू लागली. याशिवाय त्यांचे आई-बाबा त्यांना घरी बसूच द्यायचे नाहीत. अभ्यास झाला रे झाला की, त्यांना खेळायला पाठवायचे. शांत बसून राहणे त्यांना कधीच पटत नाही. मग क्रिकेट म्हणा किंवा धावण्याची शर्यत म्हणा, ते खेळ तासन्तास खेळत असत.

याशिवाय मुंबईतल्या घरापासून मैदानापर्यंत जेवढय़ा इमारती असायच्या त्या प्रत्येकीची भिंत ओलांडून मैदानापर्यंत पोहोचायची शर्यत असायची. तरुण वयात जेव्हा प्रत्येक मुलाला आपले बायसेप्स दिसावेत असे वाटते तेव्हा मात्र सुनीलजींनी व्यायामशाळा लावली आणि त्यामध्ये त्यांच्या घरच्यांनीसुद्धा प्रोत्साहन दिलं. त्यांच्या बाबांचे मत होते की, नाक्यावर उडाणटप्पूपणा करण्यापेक्षा व्यायामशाळेत गेलेले कधीही चांगले. एसी नसलेल्या व्यायामशाळेत त्यांनी जाणं पसंत केलं तेव्हा त्यांचा पर्सनल ट्रेनर असा कोणी नव्हता. व्यायामशाळेतला जो प्रशिक्षक होता तोच त्यांचा रुटीन ठरवायचा. सुरुवात नेहमी जोर बैठकांपासून व्हायची. त्या काळातल्या आणि आताच्या ट्रेनर्सच्या कोचिंगमध्ये हा मोठा फरक आहे. त्या काळातले प्रशिक्षक आपल्या हिंदुस्थानी व्यायाम म्हणजेच सूर्यनमस्कार, जोरबैठका, दंडबैठकांना जास्त महत्त्व द्यायचे. मराठी चित्रपटातील सूर्यकांत, चंद्रकांतसारखे रांगडे नायक सुनीलजींना खूप आवडायचे. विशिष्ट आहार जरी सुनीलजी पाळत नसले तरी त्यांना भिजवलेले बदाम, शेंगदाणे खायला खूप आवडायचे. याशिवाय पेहलवान म्हणजे दूध आलंच. ‘मोरूची मावशी’चा प्रयोग कोल्हापुरात असेल तर सकाळी सहाला उठून ते ताजे दूध प्यायला दूध कट्ट्यावरसुद्धा जायचे. बरं, त्या काळात मराठी चित्रपटात व्यायामाला फार महत्त्व नव्हतं. त्यामुळे त्यांची बऱ्याचदा खिल्लीसुद्धा उडवली गेली.

‘‘व्यायामापेक्षा अभिनयाकडे लक्ष दे! रंगमंचावर चेहऱ्यांचे स्नायू महत्त्वाचे असतात, शरीराचे नाहीत’’ इत्यादी इत्यादी, पण त्यांचे गुरू विनयजी आपटे मात्र ‘‘व्यायाम पण तेवढाच महत्त्वाचा असतो, नटांनी व्यायाम केलाच पाहिजे’’ या मताचे होते. विनय आपटेंबरोबर त्यांचे सगळे शिष्य पंजा लावायचे, पण विनय आपटेंसमोर बऱ्याचदा सुनीलजींना हार पत्करावी लागली. तेव्हा शूट व प्रयोगासाठी वेळेत पोहोचायची धावपळ हाच त्यांचा कार्डिओ होता. आज जवळ जवळ 34 वर्षे ते या इंडस्ट्रीमध्ये आहेत. आजही पन्नाशीत असूनसुद्धा ते अत्यंत स्लिम ऍण्ड ट्रिम आहेत. इतके बारीक राहण्याचे श्रेय ते त्यांच्या फॅमिलीच्या जिन्सना देतात. त्यांच्या परिवारात जाड असे कोणीच नाही. सगळे सडसडीत, बारीक असे आहेत. त्याशिवाय त्यांच्या बाबांचा एक गुरुमंत्र आहे. ज्याक्षणी मी कोणाला ‘‘अरे, जरा पाणी आण रे’’ असं सांगेन त्याच क्षणी मी माझं वय झालंय हे मान्य करीन. ‘‘माणूस जोपर्यंत स्वतःचे काम स्वतःच करतो तोपर्यंत तो एक प्रकारचा व्यायामच करत असतो.’’ बाबांचं हे वाक्य सुनीलजींनी लक्षात ठेवलं आहे म्हणूनच तेसुद्धा स्वतःचे काम स्वतःच करतात. आजही ते गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये जॉगिंगसाठी जातात. रोज 10 किमी धावणे हे त्यांचे लक्ष्य असते. साधारण तासाभरात ते हे लक्ष्य पूर्ण करतात. धावपळ करताना कुठलीही दुखापत होऊ नये यासाठी ते त्यांचे मित्र डॉ. अश्विन सामंत, जे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार धावतात. 10 किमी नुसतेच जोरात धावणे नसून थोड चालणे, मग चालण्याचा वेग वाढवणे, मग जॉगिंग, मग मध्येच प्रिंट रन करणे. मग परत रिलॅक्स होणे असा तो सेशन असतो. आजही त्यांचे मित्र अश्विन सामंत यांच्याबरोबर कम्पाऊंड वॉल चढण्याची शर्यत लागते. सुनीलजींचे ठाम मत आहे की, ते बारीक राहण्यामागचे कारण म्हणजे ते शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांच्या शरीरात ऑनिमल फॅटस् नसल्यामुळे त्यांचे वजन फार वाढत नाही.

माणसांनी स्वतःचे डाएट जरी सांभाळले तरी तो फिट राहू शकतो. तेलकट, गोड खाणे शक्यतो टाळावे. डाएटमध्ये त्यांना दीक्षित डाएट. ज्याचे सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप फॉलोअर्स आहेत. ती पद्धत आवडते. प्रत्येक जेवणानंतर एक ठरावीक टाइम गॅप असलाच पाहिजे असे त्यांचे मत आहे. आत्ताच्या तरुण पिढीला किंवा प्रत्येक वयोगटाच्या पुरुष व स्त्रियांना त्यांना सांगावेसे वाटते की, असा व्यायाम करा, ज्याचा तुम्हाला दीर्घकाळ फायदा होईल. नुसते मसल्सच्या मागे न धावता तुम्ही आतून कसे फिट राहाल या विचारानेच तुम्ही तुमचा व्यायाम ठरवा. त्यांना विशेष शरीर सौष्ठवाची आवड नसूनही त्यांना वरुण धवन, ऋतिक रोशनची शरीरयष्टी आवडते. ते अशा एका भूमिकेची वाट बघत आहेत, ज्यात त्यांना अशी शरीरयष्टी करावी लागेल. ‘भूमिकेसाठी काही पण’ हा त्यांचा स्वभाव आहे..या लेखातून एक नक्कीच लक्षात येते की, व्यायाम म्हणजे नुसते व्यायामशाळेत जाऊन मसल्स वाढवणे नाही. प्रत्येकाच्या व्यायामाच्या तऱहा वेगळय़ा असतात, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपल्याला फक्त एवढेच शोधून काढायचेय की, आपल्यासाठी सर्वेत्तम काय आहे आणि त्यावर मेहनतसुद्धा घ्यायची आहे. अशी म्हण आहे की, ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ तसेच व्यायामाचे परिणाम लगेच दिसतीलच असे नाही. प्रत्येकाच्या शरीरासाठी व्यायाम वेगवेगळा असतो. आपण फक्त मेहनत करायची तयारी ठेवणे व रोज शून्यापासून सुरुवात करणे या गोष्टी मन लावून केल्या पाहिजेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या