
चोर समजून केलेल्या मारहाणीत प्रवीण लहाने या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्युप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पाच जणांना अटक केली. जोरासिंग ऊर्फ जीवन भट, जनक भट, हर्षित गांधी, मनीष गांधी आणि हेमंत रामभिया अशी त्यांची नावे आहेत. त्या पाच जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मूळचा सिन्नरचा रहिवासी असलेला प्रवीण हा बुधवारी रात्री बोरिवली परिसरात आला. रस्ता न समजल्याने तो एका इमारतीजवळ गेला. तेव्हा इमारतीचा सुरक्षा रक्षक जोरसिंग आणि जनक भटने प्रवीणला चोर समजून मारहाण केली. त्यानंतर हर्षित, मनीष आणि हेमंत हे तिघे खाली आले. त्यांनी चोर समजून प्रवीणला बॅट, लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत प्रवीण गंभीर जखमी झाला.
सोसायटीत चोर शिरल्याची माहिती त्या इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रवीणला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा अचानक तो खाली पडला. त्याला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रवीणच्या मृत्युप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच रात्री त्या पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी झाल्यावर त्या पाच जणांना अटक केली. अटक करून त्यांना आज न्यायालयात हजर केले होते.

























































