
बुलढाणा शहरात अवैधरित्या येणारा गांजा पकडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. गुप्त माहितीच्या आधारे चिखली रोडवरील गोलांडे लॉनच्या विरूद्ध दिशेला एका घरात हा गांजा पकडण्यात आला. आज दुपारच्या सुमारास झालेल्या या धडाकेबाज कारवाईत गांजा घेऊन येणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशमधून हा गांजा बुलडाण्यापर्यंत आल्याची माहिती सुत्रांनी दिली. यात एकूण किती किलो गांजा पकडला हे अद्याप कळाले नाही. घाटाखालील कुन्हा गोतमारा भागातील दोन युवक बुलढाणा शहरात चिखली रोडवर दोन रूमच्या खोलीत राहतात. जिल्हाभरात गांजा पोहोचविण्याचे काम ते करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या दोन जणांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊन असताना, वाहने बंद असतांना एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर बुलढाणा जिल्हा मुख्यालयी गांजा पोहोचलाच कसा याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.























































