जन्म घेताच पॉझिटिव्ह आली मुलगी; पाच दिवसांत केले कोरोनाला पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पटणा येथील एम्स रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. ती मुलगी जन्मताच पॉझिटिव्ह आली. परंतु कमजोर वाटणाऱया या मुलीने पाच दिवसांतच कोरोनाला पराभूत केले आहे.

कोरोना महामारीमुळे देशभरातून नकारात्मक बातम्या मोठय़ा प्रमाणावर समोर येत आहेत. अशातच पटणा येथील एम्स रुग्णालयात दिलासादायक घटना घडली आहे. संगीता शर्मा नावाची आठ महिन्यांची गर्भवती महिला खोकला, सर्दीचा त्रास होत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. दरम्यान, प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांना या महिलेचा जीव वाचवण्यासाठी वेळेपूर्वीच डिलिव्हरी करावी लागली.

संगीताने एका मुलीला जन्म दिला, पण त्या बाळाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पटणा एम्सने त्या मुलीला कोविड केअर युनिटमध्ये खास देखरेखीखाली ठेवले, परंतु तिने अवघ्या 5 दिवसांतच कोरोना विषाणूचा पराभव केला.