
‘बेस्ट’च्या ताफ्यात आता आणखी पाच डबलडेकर तर दहा एकमजली बस गाडय़ा समाविष्ट होणार आहेत. डबलडेकर बस मार्ग क्र. ए-115 वर कार्यान्वित होतील तर या एकमजली बसगाडय़ा ए-351 बसमार्गावर, मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीजसंग्राही पेंद्र (माहुल) यादरम्यान चालवल्या जाणार आहेत. या बसगाडय़ा इलेक्ट्रिक एसी असल्यामुळे पर्यावरणपूरक असून या बसगाडय़ांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होणार नाही.
पर्यावरण संवर्धनासाठी ‘बेस्ट’मध्ये 2027 पर्यंत 100 टक्के बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘बेस्ट’ प्रशासनाकडून यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 900 डबलडेकर बस आणल्या जाणार असून आतापर्यंत 47 बस आल्या आहेत. तर डबलडेकर 5 बसगाडय़ा 24 नोव्हेंबर सकाळी 8.45 वाजल्यापासून दर 30 मिनिटांच्या कालांतराने बसमार्ग क्र.ए-115 वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए यादरम्यान कार्यान्वित करण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पुढील कालावधीत आणखी नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक एकमजली आणि दुमजली बसगाडय़ांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यासाठी ‘बेस्ट’ने ’ऑलेक्ट्रा’ या संस्थेला एकूण 2100 एकमजली बस गाडय़ा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिला आहे. याअंतर्गत या संस्थेने आजतागायत एकूण 30 बसगाडय़ांचा पुरवठा केलेला असून लवकरच उर्वरित बसगाडय़ांचादेखील पुरवठा करण्यात येणार आहेत.
अशा राहणार सुविधा
या बसगाडय़ा पर्यावरणपूरक असून या बसगाडय़ांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हींची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशांच्या सोयीकरिता मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही सदर बसमध्ये असून प्रवाशांना या दुमजली बसगाडीमध्ये प्रवास करताना अतिरिक्त बसभाडे न देता, इतर सर्वसाधारण एकमजली बसगाडय़ांमध्ये प्रवास करतानाचेच बसभाडे द्यावे लागणार आहे.































































