पाच ड्रग्ज पेडलरला एनसीबीने केली अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबीने ) आणखी पाच ड्रग्ज पेडलरला अटक केली. सोमवारी त्या सर्काना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ड्रग्ज प्रकरणी अटक झालेल्याची संख्या आता 16 झाली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात तपास करत असताना ड्रग्ज लिंक समोर आल्यावर एनसीबीने 10 जणांना अटक केली होती. गेल्याच आठवडय़ात एनसीबीने खार येथून अनुज केसवानीला अटक केली होती. त्याच्याकडून मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते. अनुजच्या चौकशीत करमजीत सिंगचे नाव समोर आले. त्याच्याकडून एनसीबीने गांजा जप्त केला. तो बॉलिवूड मधील काहींना ड्रग्ज देत होता. त्याच्या चौकशीनंतर एनसीबीने डी. फर्नांडिस, संकेत पटेल, अंकुश अंरेजा, संदीप गुप्ता आणि आफताब अन्सारीला ताब्यात घेतले. फर्नांडिस हा शोविकला ड्रग्ज पुरवत असायचा अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे. तर संकेत पटेल हा करमजीत च्या संपर्कात होता. तसेच रिक्षा चालक असलेला संदीप गुप्ता हा ड्रग्ज खरेदी करून ते नेण्याचे काम करायचा. अंकुश हा मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये हॉटेल चालवतो. तो एमडी, गांजाची विक्री करायचा. तो संकेत कडून अमली पदार्थ घ्यायचा. तर आफताब हा संदीपला अमली पदार्थ देत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या