
सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यात आज सरासरी 37.71 मिलीमीटर पाऊस पडला. शिरोळ येथे सर्वात जासत 55 मिलीमीटर, तर त्या खालोखाल जयसिंगपूर येथे 41 मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान, पावसामुळे तालुक्यात पाच ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले. कुरुंदवाड येथे नागरी वस्तीत पाणी शिरल्याने तेथील 9 कुटुंबांतील 40 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तालुक्यातील 18 मार्ग पुराचे पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
शिरोळ तालुक्यात आजअखेर 327 मिलीमीटरच्या सरासरीने 2289 मिलीमीटर पाऊस पडला आहे. दरम्यान कुरुंदवाड येथे पाच घरांच्या भिंत कोसळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. कुरुंदवाड येथे नगरपालिका हद्दीजवळ असलेल्या गोठणपूर भागात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील नऊ कुटुंबांतील अशा 40 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
राधानगरी धरणापाठोपाठ कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा व वारणा या नद्यांसह उपनद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून सोडलेले पाणी शिरोळ तालुक्यात रात्री उशीरा पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावध रहावे, असा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील दानोळी, दूधगंगा नदीवरील दत्तवाड व कृष्णा नदीवरील राजापूर हे तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणात 78.29 टीएमसी पाणीसाठा असून अलमट्टी धरणात 105 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
तालुक्यातील शिरढोण-नांदणी पूल, धरणगुत्ती-शिरोळ मार्ग, कोल्हापूर-सांगली नवीन बायपास रस्ता यांसह तालुक्यातील तब्बल 18 मार्ग पाणी आल्याने वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.



























































