
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना घडली आहे. अजयगड तालुक्यातील बिहारपुवा येथे आठ ते दहा दिवसांपासून सात मजूर बिनू अहिरवार यांच्या शेतात विहीर खोदत होते. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या भूस्खलनात पाच मजूर जिवंत गाडले गेले. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली.
मंगळवारी खोदकामादरम्यान दोन मजूर पाणी पिण्यासाठी वर आले असता, विहिरीची माती अचानक कोसळली आणि आत काम करणारे पाच मजूर गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. गावकऱ्यांच्या मदतीने ढिगाऱ्याखालील माती बाजूला करण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर पाचही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरल्यामुळे पाचही जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. चुन्नू यादव, राजकुमार यादव, आशिष यादव आणि चुनवड पाल अशी मृत मजूरांची नावे आहेत. बचावकार्यादरम्यान त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. या अपघातामुळे संपूर्ण बिहारपुवा गावावर शोककळा पसरली.



























































