पाच महिन्यांत 53 हजार उंदरांचा खात्मा, कीटकनाशक विभागाची जोरदार मोहीम

483

अनेक साथीच्या आजारांच्या प्रसाराला कारणीभूत ठरणार्‍या उंदरांचा उपद्रव थांबवण्यासाठी पालिकेने जोरदार मोहीम राबवताना पाच महिन्यांत तब्बल 53 हजार 89 उंदरांचा खात्मा केला आहे. पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून जानेवारी ते 28 मेपर्यंतच्या कालावधीत ही मोहीम राबवली आहे.

साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून शहर आणि उपनगरात पाणी साचणार्‍या 436 ठिकाणांचा शोध घेण्यात आला. यामध्ये तब्बल 29 हजार 228 उंदरांची बिळे आढळून आली. उंदीर अधिवासाची ही ठिकाणे शोधून काढल्यानंतर उंदीर मारण्यासाठी विभागवार मोहीम राबवण्यात आली. यामध्ये हजारो उंदीर मारण्यात आले. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जानेवारीपासूनच काम सुरू असल्याचे कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

अशी राबवली जातेय मोहीम
उंदरांचा शोध घेण्यासाठी किटक नाशक विभागाच्या माध्यमातून 137 कामगार आपली जबाबदारी पार पाडतात. तर काही खाजगी संस्थांची मदत या कामात घेण्यात येते. परंतु यंदा कोरोनाचे संकट असून लॉकडाऊन असल्याने खासगी संस्थांना काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत किटक नाशक विभागातील कामगार रात्रंदिवस सेवा देत आहेत.

तसेच कोरोनामुळे योग्य प्रकारे काम करणे शक्य होत नसल्याने काही कामगार सुट्टीच्या दिवशीही आपली सेवा देत आहेत. पाणी भरण्याच्या ठिकाणांसह सोसायटी परिसरात ही उंदीर मारण्याचे औषध टाकण्याचे काम सुरु असून ही मोहीम पुढील चार महिने सुरूच राहणार असल्याचे राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

महिना उंदरांचा खात्मा
जानेवारी – 6,265
फेब्रुवारी – 6,037
मार्च – 28,779
एप्रिल – 6,835
मे 28 पर्यंत – 5,174

आपली प्रतिक्रिया द्या