राहुरीच्या जेलमधून मोक्कातील तिघांसह पाचजण पळाले, तिघांना अटक करण्यात यश; दोघे फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी पोलीस ठाण्याच्या तुरुंगाच्या खिडकीचे गज आणि जाळी कापून ‘मोक्का’अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या टोळीतील तिघे आणि इतर गुन्ह्यांतील दोघे असे पाचजण फरार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. फरार आरोपींपैकी दोघांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करून तत्काळ पकडले असून, तिसऱ्याला मनमाडमध्ये ताब्यात घेण्यात आले. उर्वरित दोनजणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, सहायक पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असून, दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली आहे.

सागर अण्णासाहेब भांड (वय 25, रा. शिरूर, जि. पुणे), नितीन ऊर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय 22, रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासा), रवि पोपट लोंढे (वय 22, रा. घोडेगाव, ता. नेवासा), तसेच इतर गुह्यांतील आरोपी जालिंदर मच्छिंद्र सगळगिळे (वय 25, रा. टाकळीमिया, ता. राहुरी), किरण अर्जुन अजबे (वय 26, रा. भिंगार, ता. नगर ) हे पाचजण फरार झाले होते. यांतील सागर भांड व किरण आजबे यांना पाठलाग करून, तर जालिंदर सगळगिळे याला मनमाड रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले.

राहुरी पोलीस ठाण्याच्या कारागृहातील 4 नंबर बरॅकमध्ये 17 गुन्हेगारांना ठेवण्यात आले आहे. यात ‘मोक्का’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेले नितीन माळी, रवि लोंढे, सागर भांड, तसेच इतर गुह्यांतील जालिंदर सगळगिळे व किरण अजबे यांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे 4 नंबर बरॅकच्या 12 फूट उंच भिंतीच्या खिडकीचे 12 एमएम जाडीचे गज, तसेच लोखंडी जाळी कापून जेलच्या पाठीमागच्या बाजूने या पाच आरोपींनी पलायन केले.

जेलच्या पाठीमागील भागाचा वापर गुह्यात पकडलेल्या दुचाकी ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. जेलच्या लोखंडी खिडकीचे गज कापून आरोपी पळाल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. फरार आरोपींच्या शोधासाठी बाहेर पडलेल्या पथकाने राहुरी न्यायालयाजवळून मल्हारवाडीकडे जाणाऱया रस्त्यावर भांड व आजबे यांना पाठलाग करून पकडले. जेलमधून आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना भेटण्यासाठी आठवडाभरात आलेल्या लोकांची पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे.

पोलीसपुत्राची टोळी; 27हून अधिक गुन्हे

टोळीप्रमुख भांड याच्यावर राहुरी, एमआयडीसी, कोतवाली, भिंगार कॅम्प, शिक्रापूर, संगमनेर शहर, सुपा येथील पोलीस ठाण्यांत 27, लोंढे याच्यावर राहुरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा, नीलेश शिंदे याच्यावर राहुरी, एमआयडीसी, तोफखाना पोलिसांत सात, माळी याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात पाच, माळी व रमेश शिंदे याच्यावर राहुरी पोलिसांत पाच गुन्हे दाखल आहेत. ही टोळी संघटितपणे गुन्हे करीत होती. विशेष म्हणजे, टोळीप्रमुख सागर भांड याचे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते. या टोळीवरील गुह्यांची गंभीर दखल घेऊन पोलीस उपअधीक्षक मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यामार्फत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याकडे पाठविला होता. त्याला त्यांनी नुकतीच मंजुरी दिली होती.

गज आतल्या बाजूने कापणे अशक्य ? 

राहुरी जेलच्या 4 नंबर बरॅकमध्ये 17 आरोपी ठेवण्यात आले होते. बरॅकची भिंत 12 फूट उंच असल्याने आतून खिडकीचे गज कापणे अशक्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जेलच्या बाहेरील बाजूचा भाग निर्मनुष्य असून, या जागेचा वापर गुह्यातील दुचाकी ठेवण्यासाठी केलेला आहे. खिडकीचे 12 एमएम जाडीचे तीन गज व लोखंडी जाळी बाहेरच्या की आतील बाजूने कापण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. गज कापण्याचा कार्यक्रम हा एक दिवसापुरता मर्यादित नसून, पाच ते सहा दिवसांपासून तो सुरू असण्याची शक्यता आहे.