सोलापूर शहरातील पाच सिग्नल होणार डिजिटल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा न्यायालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटलजवळील सिव्हिल चौक, सर्वाधिक रहदारी असलेला सरस्वती चौक, जड वाहतुकीमुळे सर्वाधिक अपघात होणारा शांती चौक व जुना मार्केट यार्ड चौक आणि आसरा चौकातील सिग्नल आता डिजिटल होणार आहेत. या संदर्भात शहर पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवले आहे.

सोलापूर शहरातील वाहनांची संख्या आता सात लाखांपर्यंत झाली असून, इतर जिल्ह्यांतून व ग्रामीण भागातून शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यात दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय झाली आहे. दरमहा सरासरी अडीच ते तीन हजार वाहनांची भर पडत आहे.

वाहनांच्या संख्येच्या तुलनेत शहरातील रस्त्यांची रुंदी अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे शहरात आता वाहतूककोंडी नेहमीचीच झाली आहे. दुसरीकडे वाहनांचा किशेषत: दुचाकी व चारचाकी वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी, यासाठी पहिल्यांदा शहरातील सिग्नल यंत्रणा भक्कम असणे जरूरी आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पाच सिग्नल डिजिटल करण्यासंदर्भात महापालिकेला प्रस्ताव दिला आहे.

सोलापूर शहरातील प्रमुख चार-पाच चौकांतील सिग्नल डिजिटल करण्यासाठी आम्ही महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. वाहतुकीला स्वयंशिस्त लागावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, हा त्यामागील हेतू आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी लवकरच त्या संदर्भात निर्णय घेऊ, अशी माहिती पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी सिग्नल राहणार बंद

सोलापूर शहरात सध्या 19 चौकांमध्ये सिग्नल असून, त्यातील काही बंद आहेत, तर 13 ते 14 सिग्नल सुरू आहेत. सिग्नल यंत्रणा 25-30 वर्षांपूर्वीची जुनाट असल्याने उन्हामुळे काही सिग्नल आपोआप बंद पडण्याचेही प्रकार घडत आहेत. दरम्यान, आता दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने सिग्नलवर थांबणे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा आणि त्यानंतर दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवले जाणार आहेत. म्हणजेच दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत सिग्नल बंद राहणार आहेत. जेणेकरून नागरिकांना उन्हाचा त्रास होणार नाही, हा त्यामागील हेतू आहे.