
दिवाळीनिमित्त मूळगावी गेलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी करत दहशत पसरवली आहे. चोरट्यांनी वारजे, धायरी, मार्केटयार्ड, विश्रांतवाडी पौड रस्ता, कोंढवा भागातील घरातून लाखोंचा ऐवज लांबवला आहे.
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 25 हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना 15 ते 17 नोव्हेंबर कालावधीत वारजेतील आण्णा चौधरी नगरमध्ये घडली. याप्रकरणी विष्णू पाटील (वय 43) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी केशव रायकर (वय 65) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी घराची कडी कापून 14 हजार 300 रूपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून 1 लाख 55 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी रमेश कांबळे (वय 62) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विश्रांतवाडीतील विश्रांत सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेच्या घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी 2 लाख 60 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी पाहून चोरट्यांनी पौड रस्त्यावर एका सोसायटीतील महिलेची रोकड आणि दागिने मिळून एकूण 2 लाख 48 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला सकाळी फिरायला बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या कपाटातील रोकड आणि दागिने असा 2 लाख 48 हजारांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे तपास करत आहेत.
स्वयंपाकघरातील उघड्या खिडकीतून घरात शिरुन चोरट्यांनी 47 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना कोंढव्यातील भागोदयनगर परिसरात एका सोसायटीत घडली. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.
























































