
मुंबईतील विविध विकासकामांसाठी 429 झाडे कापण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र 429 झाडांच्या बदल्यात दुप्पट म्हणजे 858 झाडे लावण्यात येणार आहेत. तर 427 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे 27 पैकी मंजूर झालेल्या 24 प्रस्तावांनुसार एकूण 4 हजार 987 झाडे वाचणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
मुंबईतील विविध विकासकामांमध्ये असणारी झाडे तोडण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक असते. यानुसार गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध कामांबाबतचे एकूण 27 प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले. यामध्ये 12 ऑक्टोबरच्या सभेचे 7 प्रस्ताव तर 20 जानेवारीच्या सभेतील 20 प्रस्तावांचा समावेश होता. यामध्ये एकूण 4702 झाडे कापणे आणि हटवणे प्रस्तावित होते. अशा एकूण 27 प्रस्तावांतील तीन प्रस्ताव राखून ठेवण्यात आले, तर 24 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये जास्तीत जास्त झाडे वाचवण्यासाठी शिवसेनेकडून आग्रह धरण्यात आला. यानुसार फक्त 429 झाडे कापण्यास तर 427 झाडे पुनर्रोपित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.




























































