पॅरोलवर बाहेर येऊन सहा वर्षे फरार कैदी मीरा रोडमधून गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

ओशिवरा येथे एका हत्येच्या गुह्यात अटक झाल्यानंतर नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा फारुख हसन बागवान (41) हा कैदी 15 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला. त्यानंतर तो कारागृहात परतलाच नाही. सहा वर्षे तो ओळख लपवून राहत होता. अखेर मुंबई क्राइम ब्रँचने त्याला शोधून काढले.

2008 मध्ये फारुखला ओशिवरा पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात पकडले होते. मग कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. 2012 मध्ये तो 15 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला तो पुन्हा कारागृहात परतलाच नाही. त्यामुळे फारुखला फरार घोषित करून त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दरम्यान, पॅरोलवर बाहेर आलेला एक आरोपी गेल्या सहा वर्षांपासून मीरा रोड येथे ओळख लपवून राहत असल्याची खबर युनिट-9 ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गेल्या 15 दिवसांपासून फारुखच्या वॉचवर होते. आज अखेर त्याला पकडले. पुढील कारवाईसाठी फारुखला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याच्या विरोधात बरेच गुन्हे असल्याचे समजते.

summary- fled accuse got arrested again