
अहमदाबाद विमान अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग नुकताच घडला. तब्बल 168 प्रवाशांसह गुवाहाटीहून चेन्नईला जाणारे इंडिगोचे विमान अचानक बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले. या विमानतळावर उतरताना पायलटने ‘मे डे’ कॉल दिला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली व विमानतळ यंत्रणांची एकच तारांबळ उडाली.
संबंधित विमानाच्या पायलटने गुरुवारी 19 जून रोजी नियोजित वेळेनुसार सायंकाळी 7.45 वाजता चेन्नई विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र विमानतळावर गर्दी असल्याने त्याला विमान वेळेवर उतरवता आले नाही. त्यामुळे त्याने येथील लँडिंग रद्द करून विमान बंगळुरूकडे वळवले. हे विमान रात्री 8.15 वाजता विमान बंगळुरूमध्ये उतरले. केम्पेगौडा विमानतळावर उतरण्याच्या सुमारे 35 मिनिटे आधी पायलटने इंधन पुरेसे नसल्याचे सांगत ‘मे डे’ कॉल दिला. त्यानंतर एअर ट्रफिक कंट्रोलने विमान तातडीने उतरवण्यास परवानगी दिली.