
कोरोना महामारीच्या काळात घसरलेली विमान प्रवाशांची संख्या आता 132 टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर निर्बंधही हटवले गेले आहेत. त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे.
यंदा जानेवारी ते जूनमध्ये मुंबईतून बाहेर जाणाऱया आणि बाहेरून मुंबईत आलेल्या प्रवाशांची संख्या 1 कोटी 70 लाख होती. मे महिन्यात सर्वाधिक प्रवाशांनी मुंबई विमानतळावरून प्रवास केला. सहा महिन्यांत 1 कोटी 70 लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यातील 40 लाख प्रवाशांनी एकटय़ा मे महिन्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास केला. सर्वाधिक 1 लाख 23 हजार 442 प्रवाशांची नोंद 21 मे 2022 या दिवशी झाली. जूनमध्ये प्रवाशांची संख्या 8 लाख 30 हजार इतकी होती.
































































