आसाममध्ये पुराने घेतला २३ जणांचा बळी, ४ लाख नागरिक बेघर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

उत्तर आणि ईशान्येकडील राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवेत आर्द्रता वाढल्याने दिल्लीत धुळीच्या वादळांपासून लोकांना दिलासा मिळाला आहे. तर आसाममध्ये पुराने थैमान घातले असून ६ जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. यात २३ जणांचा बळी गेला असून ४ लाखांहून अधिक बेघर झाले आहेत. यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हवाईदलाच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

vayu-sena

ईशान्येकडील राज्यात आलेल्या या विनाशकारी पुराने २४ तासांत सहा जणांचा जीव घेतला आहे. त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २३ झाल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी आसाममध्ये पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर मणिपुर येथे एकाचा मृत्यू झाला आहे. आसाममधील सहा जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. होजई, कर्बी आंगलांग पश्चिम, गोलाघाट, करीमगंज, हेलकांडी आणि कचरा या जिल्ह्यातील ४.४८ लाख नागरिक बेघर झाले आहेत.

ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धनसिरी सारख्या नद्याही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आजूबाजूची गावे रिकामी करण्यात आली आहेत. मणिपुरमधील इम्फाळ घाटातही नद्यांनी पातळी ओलांडली आहे. तर लिलोंग नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे पंजाब, हरयाणामध्येही पावसाचे दमदार आगमन झाले आहे. राजस्थानमध्ये मात्र तापमानात वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ब्रेक घेत पाऊस कोसळत आहे, त्यामुळे तापमानात घट झाली आहे.