सलग पावसाचा उडीद, मूग, कोथंबीर टोमॅटोला फटका; तुरही पिवळी पडून पिक धोक्यात

अक्कलकोट शहर व परिसरात शनिवार मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सलग तीन दिवस सुरूच होता. या पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील उडीद, मूग, तूर, फळभाज्या, कोथिंबीर, टोमॅटो आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत.

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी आणि सोमवारीही सुरू राहिला. ढगाळ वातावरणामुळे तीन दिवस सूर्यदर्शन नाही. यामुळे कोथिंबिरीसह टोमॅटोची नासधूस झाली. हजारो हेक्टरवरील कापणीस आलेले उडीद, मूग पावसाने भिजल्याने मोठी नासाडी झाली. तालुक्यात काही भागांत उडीद, मुगाची कापणी केली होती. मळणीयंत्रात घालून रास करणे बाकी होते. मात्र, पावसामुळे उडीद, मूग या तयार पिकाची मोठी हानी झाली. हलक्या प्रतीच्या जमिनीत पाणी थांबल्याने तूर पीक पिवळे पडत आहे. यामुळे तुरीच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

शनिवार, रविवार, सोमवार दिवसभर ढग आच्छादलेले होते. त्यातच संततधार पाऊस सुरू राहिला. या पावसाने शेतीची कामेही खोळंबली आहेत. पावसाने मातनाळी, नागनाळी, उडगी, हसापूर, कोन्हाळी, निमगा व मिरजगी हंजगी, काळेगाव येथील तूरपीक पिवळे पडले आहे.

भाजीपाला महागला

आठवडा बाजारही पावसाने प्रभावित झाला. ग्रामीण भागातील भाजीविक्रेते तालुक्याच्या ठिकाणी आठवडा बाजारसाठी आले नाहीत. तसेच पाऊस सुरू असल्याने आसपासचे शेतकरीही भाजीविक्रीसाठी आले नाहीत. त्यामुळे भाजीपाल्यासह फळभाज्या महागल्या होत्या.