सिद्धिविनायक मंदिरात हार-तुरे, नारळ नेण्यास परवानगी, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खबरदारी म्हणून मुंबईतील प्रभादेवी भागात असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये नारळ, हार-फुलं, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. या बंदीमुळे स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान होत होते. त्यामुळे युद्धबंदीनंतर शिवसेना त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून ही बंदी उठवण्याची मागणी केली होती. बुधवारी शिवसेनेची ही मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आता भाविक मंदिरात हार तुरे, नारळ, मिठाईचे बॉक्स घेऊन जाऊ शकतात.

ऑपरेशन सिंदूर नंतर लागू करण्यात आलेली ही बंदी हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार झाल्यानंतरही उठवण्यात आली नव्हती. या बंदीमुळे सिद्धिविनायक मंदिरात व मंदिर परिसराच्या आजुबाजुला हार तुरे, नारळ, मिठाई यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत होते. या भागात राहणाऱ्या अनेकांची सिद्धिविनायक मंदिरात दुकानं आहेत. मात्र बंदीमुळे या व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला होता. अखेर शिवसेनेच्या प्रयत्नानंतर हार-तुरे, नारळ नेण्यावरची बंदी उठवण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर घातलेली बंदी

ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये नारळ, हार-फुलं, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. नारळ, प्रसादाचा बॉक्सचा वापर स्फोटके लपवण्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता.