पावसाच्या तालावर विजेचा ‘नाच’, सततच्या रिपरिप पावसामुळे विजेच्या मागणीत चढउतार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाच्या तालावर विजेचा ‘नाच’ सुरू असल्याचे दिसत आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात सर्वत्र पाऊस असल्याने राज्याची विजेची मागणी 28 हजारांवरून 19 हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती. त्यानंतर पावसाने जवळपास पंधरा दिवसांची विश्रांती घेतल्याने विजेच्या मागणीत 22 हजार मेगावॅटपर्यंत वाढ झाली होती. मात्र आता आठवडाभरापासून रिपरिप पावसामुळे विजेच्या मागणीत पुन्हा मोठी घट झाली आहे. विजेच्या मागणीत मोठे चढउतार सुरू असून उन्हाळ्यातील कमाल मागणीचा विचार करता ती 40 टक्के म्हणजे 10 हजार मेगावॅट एवढी आहे.

महावितरणने उन्हाळ्यात 25 हजार मेगावॅटपर्यंत विजेचे वितरण केले आहे, तर मुंबई शहरासह उपनगरात सुमारे 45 लाख ग्राहक असून त्यांची कमाल मागणी 38 मेगावॅट एवढी मे महिन्यात नोंदली होती. मात्र पावसाळा सुरू होताच तापमानाचा पारा घसरल्याने सुसाट धावणारे एसी, पंख्यांचा वेग मंदावला. कृषी पंपांच्या वापरात घट झाल्याने जुलैमध्ये राज्याची एकूण मागणी 20 हजार मेगावॅटपर्यंत खाली आली होती. त्यानंतर पावसाने दहा-बारा दिवस ओढ दिल्याने जुलैच्या अखेरीस विजेच्या मागणीत पुन्हा वाढ होत राज्याची मागणी 19 हजार तर मुंबईची मागणी 3300 मेगावॅटवर गेली होती. तर गेल्या आठ दिवसांत महावितरणची विजेची मागणी 15 हजार 900 मेगावॅटपर्यंत खाली आली आहे.