
राज्याच्या अनेक भागांत पुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झाले असले तरी अनेक भागांत अजूनही पावसाने ओढ दिली आहे. राज्याच्या काही भागांत अजूनही दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने चारा छावण्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या चारा छावण्यांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दररोज किमान दहा कोटी रुपयांचा बोजा पडत आहे.
राज्यात सध्याच्या घडीला सुमारे 1 हजार 417 चारा छावण्या सुरू असून या छावण्यांमध्ये दहा लाखांच्या आसपास मोठी जनावरे म्हणजे गाई-म्हशी, बैल-रेडे अशी मोठी जनावरे आहेत. एका मोठय़ा जनावराच्या मागे 70 रुपये व शेळ्या-मेंढय़ांसारख्या लहान जनावरांच्या मागे 35 रुपये राज्य सरकार खर्च करीत होते. नंतर ही रक्कम वाढवण्यात आली. मोठय़ा जनावरासाठी 90 तर लहान जनावरासाठी 45 रुपये देण्याचा निर्णय झाला. पण जनावरांसाठी वैरण खरेदी, त्यावरील वाहतुकीचा खर्च लक्षात घेऊन 15 मे रोजी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक मोठय़ा जनावरासाठी 100 रुपये व लहान जनावरासाठी 50 रुपये देण्यास आता सुरुवात झाली आहे.

























































