
दाट धुक्यामुळे लखनऊत होणारा हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका चौथा टी-20 सामना अखेर रद्द करण्यात आला. अत्यंत कमी दृश्यतेमुळे दोन्ही संघांना एकही चेंडू टाकणे शक्य झाले नाही. त्यामुळे 2-1 अशी आघाडी असलेल्या हिंदुस्थानचा मालिका विजय लांबणीवर पडला. तसेच टी-20 मालिकेत अपराजित राहण्याची वाटचाल 15 मालिकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मालिकेचा फैसला शुक्रवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात होईल.
लखनऊमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सकाळपासूनच 400 च्या पुढे म्हणजेच अत्यंत धोकादायक पातळीवर होता. मात्र पंचांसाठी सर्वात मोठी चिंता हवेची गुणवत्ता नव्हे, तर दृश्यता होती. पंचांनी वारंवार पाहणी केली. एका पंचाने तर चौकोनी सीमारेषेवर जाऊन खेळपट्टीजवळ उंचावलेला पांढरा चेंडू दिसतो का, याची तपासणी केली. अशी एकूण सहा वेळा पाहणी झाल्यानंतर अखेर रात्री 9.26 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उत्तर हिंदुस्थानात हिवाळय़ात धुके आणि प्रदूषणामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याच कारणामुळे बीसीसीआयने याआधी दिल्लीतील कसोटी सामना दिवाळीपूर्वी खेळवण्याचा निर्णय घेतला होता.
दक्षिण आफ्रिकेचा हिंदुस्थान दौरा आता शुक्रवारी अहमदाबादमध्ये संपणार आहे. एकूणच हा दौरा यशस्वी ठरला असून कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानवर 2-0 असा विजय मिळवला, तर एकदिवसीय मालिकेत निर्णायक सामना खेळवून हिंदुस्थानने 2-1 असा विजय नोंदवला. टी-20 मालिकेत हिंदुस्थानने आपला मजबूत फॉर्म दाखवत 2-1 अशी आघाडी घेतली आहे, मात्र लखनऊचा सामना जिंकून अंतिम सामन्यापूर्वीच मालिका जिंकण्याची संधी हुकली.





























































