
सामना प्रतिनिधी । मानवत
मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथे कच्च्या दुधाची खरवस खाल्ल्याने 20 जणांना विषबाधा झाल्याची गुरुवारी सकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच उक्कलगावचे सरपंच नाथाभाऊ पिंपळे व ग्रामपंचायत सदस्य मुंजाभाऊ पिंपळे यांनी रुग्णांना मानवत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
तालुक्यातील उक्कलगाव येथील नारायण उक्कलकर यांच्या गाईने गुरुवारी पहाटे वासराला जन्म दिला होता. सकाळी दहाच्या सुमारास कच्च्या दुधाची खरवस करुन आजुबाजुला राहाणाऱ्यांना दिला. खरवस खाल्ल्यानंतर मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये 16 मुलांचा समावेश असून सर्वाची प्रकृती बरी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.





























































