मुंबईत प्रभावी क्वारेंटाईनसाठी पालिका रिकाम्या इमारती, सभागृहे ताब्यात घेणार

720

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रभावी क्वारेंटाईन करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व 24 विभागांमध्ये असणारी वसतिगृहे,  लॉज,  धर्मशाळा,  मंगल कार्यालये,  सभागृहे,  रिकाम्या इमारती,  जिमखाना,  संस्था, जहाज (क्रूज़),  महाविद्यालये इत्यादी ताब्यात घेऊन त्याठिकाणी ‘क्वारंटाईन’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत नगरसेवक-नगरसेविका, पालिका अधिकारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून सहभागी झाले होते.

‘क्वारेंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींना ठेवता येऊ शकेल, अशा ठिकाणांचा तपशील गोळा करून यादी तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान सहाय्यक आयुक्तांना दिले. ज्या ठिकाणी ‘क्वारेंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींना ठेवले जाईल, त्या व्यक्तींच्या अन्न, पाणी आदी आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.  ज्या व्यक्तींची घरे इमारतीत आहेत व पुरेशी मोठी आहेत  अशा व्यक्तींच्या बाबतीत घरातल्या घरात ‘क्वारेंटाईन’ करणे शक्य होऊ शकते. तथापि, आकाराने लहान असलेल्या चाळीतील घरात किंवा झोपडपट्टी परिसरात ‘क्वारेंटाईन’ करणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीला ‘क्वारंटाईन’ करण्यात आले, तरी घर लहान असल्यामुळे घरातील इतर व्यक्तींना किंवा नातलगांना आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या बाबतीत प्रभावी ‘क्वारेंटाईन’साठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर रिकाम्या इमारती, सभागृहे ताब्यात घेऊन क्वारेंटाईन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या