पुण्यात परदेशी प्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त; 279 कासवे, 1 हजार 207 इग्वाना सरडे, 230 बेटा फिश जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेप्रवास करून परदेशी प्राण्यांची तस्करी करणाऱया दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आफ्रिकन प्रजातीची 279 कासवे, 1 हजार 207 इग्वाना सरडे, 230 बेटा फिश जप्त करण्यात आली आहेत. तरुणकुमार मोहन (26) आणि श्रीनिवासन कमल (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. त्यानंतर ते परदेशात पाठवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपी प्राण्यांची वाहतूक कशासाठी करीत होते, यामध्ये इतर कोण सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्राण्यांचे मूल्य सुमारे 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेगाडय़ांतून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांना सूचना देऊन रेल्वेगाडय़ांवर पेट्रोलिंग करण्यास सांगितले होते. त्यानुसार मागील आठ ते दहा दिवसांपासून पथके गस्तीवर होती. दरम्यान, पुणे ते लोणावळा प्रवासात चेन्नई एलटीटी एक्स्प्रेसमधील ए/1 बोगीमधून प्रवास करणारे दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी करून 4 ट्रव्हल बॅगा व दोन सॅगबॅगची तपासणी केली असता त्यामध्ये कासव, इग्वाना जातीचे प्राणी व फायटर फिश आढळून आल्या. त्यांना प्राण्यांची वाहतूक करीत असल्याबाबत विचारणा केली त्या वेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना त्यांच्या बॅगांसह ताब्यात घेण्यात आले.