फॉरेन्सिक लॅबची क्यूआरटी थ्रीडीने होणार व्हिडीओग्राफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर। मुंबई

बॉम्बस्फोट, हत्या किंवा गोळीबाराची घटना अशा वेळी घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करण्याचे काम महत्त्वाचे असते. आता पोलिसांसोबत कलिनाच्या न्यायसहायक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब)ची क्विक रिस्पॉन्स टीम  (क्यूआरटी) घटनास्थळी जाऊन काम करणार आहे. ‘क्यूआरटी’ करिता 84 जणांची निवड करण्यात आली आहे.

गृह विभागाच्या राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अमरावती, कोल्हापूर, नांदेड येथे फॉरेन्सिक लॅब आहेत. या लॅबमध्ये आत्महत्या, हत्या, विषप्रयोग, बॉम्बस्फोट अशा महत्त्वाच्या केसेस येत असतात. तर काही हायप्रोफाइल केसेसमध्ये फॉरेन्सिक लॅबची महत्त्वाची भूमिका होती. डीएनए चाचण्या, गोळीबार अशा महत्त्वाच्या केसेसही लॅबमध्ये येत असतात. कित्येकदा आरोपी हे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करतात. तर कधी उशीर झाल्यामुळे पुरावे मिटतात. त्याचा परिमाण केसेसवर होतो. याची दखल घेत गृह विभागाने फॉरेन्सिक लॅबची ‘क्यूआरटी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी तात्पुरत्या स्वरूपात एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली होती. पण आता 84 एक्सपर्टची कायमस्वरूपी टीम तयार करण्यात आली आहे. फॉरेन्सिकच्या मोबाईल युनिटमध्ये ही टीम काम करेल. त्यात अधिकारी आणि कर्मचारी असतील.  काही महत्त्वाच्या गुह्यात फिंगर प्रिंट महत्त्वाचे असते. फिंगर प्रिंटमुळे गुह्याची उकल होण्यास पोलिसांना मदत होते. नुकतेच अंधेरीच्या एमआयडीसी येथील रुग्णालयात आग लागली होती. आगीनंतर फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी गेली होती. घटनास्थळी जाऊन नेमके आगीचे कारण पोलिसांना सांगितले होते.

असे काम करेल टीम

या टीममध्ये बायोलॉजी, टॉक्सिकोलॉजी, बेलॅस्टिक आणि सायबर एक्सपर्ट असणार आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच एक्सपर्ट असलेले कर्मचारी असणार आहे. हत्या किंवा गोळीबार झाला तेव्हा ही टीम घटनस्थळी जाईल. तेथील पुरावे गोळा करून ते रासायनिक विश्लेषणकरिता वेळेत पाठवले जातील. त्यामुळे वेळेत तपासण्या होऊन त्याचा अहवाल पोलिसांना सादर केला जाईल. त्यामुळे कन्व्हिक्शनचे प्रमाण वाढेल. तसेच थ्रीडीने व्हिडीओग्राफीदेखील करण्यात येणार आहे.

‘क्यूआरटी’ची टीम घटनास्थळी जाईल. तेथून महत्त्वाचे पुरावे गोळा करतील. पाच जणांची टीम आता एखादी घटना घडल्यावर घटनास्थळी जाईल. घटनास्थळी गेल्यावर पुरावे कोणते गोळा करायचे, ते कसे गोळा करायचे, याचे खास कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

– डॉ. के. व्ही. कुलकर्णी, संचालक