पाथर्डीत बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील नागरिक 15 दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत होते. लहान मुलांसह तीनजणांचा बळी गेल्यानंतर गुरुवारी एका बिबट्याला सावरगावला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले. या बिबट्याला नगरच्या वन विभागामध्ये हलविण्यात आले आहे. तसेच, हा बिबटय़ा नरभक्षक आहे की नाही, याची माहितीही घेण्यात येत आहे.

पाथर्डी तालुक्यात पंधरा दिवसांपासून नरभक्षक बिबटय़ाची दहशत निर्माण झाली होती. शिरापूर येथे चार दिवसांपूर्वी एका बालकाला बिबटय़ाने ठार केले होते. या घटनेनंतर संताप व्यक्त होत होता. बिबटय़ाला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. तसेच, वन विभागाचे अधिकारी व विशेष पथकही येथे आले होते. तसेच, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यांनी शिरापूर येथे जाऊन संबंधित कुटुंबाचे सांत्वन केले होते.

वन विभागाने बिबटय़ासाठी 14 पिंजरे लावले होते. बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी वन विभागासह नाशिक, संभाजीनगर येथील विशेष पथक बोलावले होते. ही पथके चार दिवसांपासून बिबटय़ाचा शोध घेत होती. जिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, तेथील सातत्याने माहिती घेतली जात होती.

दोन दिवसांपासून बिबटय़ा हा वृद्धेश्वर, मायंबा, मढी परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली होती. वन विभागाने सावरगाव येथे पिंजरा लावला होता. या पिंजऱयामध्ये गुरुवारी बिबटय़ा जेरबंद झाला. याबाबत माहिती मिळताच, वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नंतर बिबटय़ाला नगरला आणले. हा बिबटय़ा नरभक्षक आहे की नाही, याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. हा बिबटय़ा आठ वर्षांची मादी असल्याची माहिती नगर येथील वन अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे आता नरभक्षक बिबटय़ा जवळच्याच परिसरात असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.