देवाची करणी नारळात पाणी…पण नारळात पाणी पोहचते कसे.. वाचा सविस्तर…

न्यूटन सफचंदाच्या झाडाखाली बसला होता. सफरचंद खाली पडले आणि फळ खालीच का पडले या प्रश्नाचे उत्तर शोधताना न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. मात्र, नारळ, ताड, माड यासारख्या उंच झाडांमध्ये या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धातांविरोधात पाणी वर कसे चढते, असा प्रश्न अनेकांना पडतो. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध ऊंच झाडावरील नारळात पाणी किंवा इतर उंच वृक्षाच्या सर्वात वरील फांदीपर्यंत पाणी पोहचण्यासाठी सूर्यप्रकाशी गरज असते. त्याचप्रमाणे झाडातील नलिकांचे कार्यही महत्त्वाचे असते.

झाडामध्ये पाणी इतक्या उंचीवर चढायला एक इफेक्ट काम करतो. त्याचे नाव कॅपलरी इफेक्ट (‘capillary effect’)आहे. अरुंद नलिका किंवा सच्छिद्र पदार्थातून द्रवाचा होणारा स्वयंस्फूर्त प्रवाह हा कॅपलरी इफेक्ट म्हणून ओळखला जातो. यात नलिका जेवढी अरुंद असेल तेवढे पाणी उंच जाईल. याच इफेक्टमुळे नारळाच्या झाडात उंचावरही पाणी पोहचते. कोरा या प्रश्नोत्तराच्या साइटवर विचारण्यात आलेल्या या प्रश्नाबाबत आशिष प्रभुदास प्रधाने यांनी उत्तर दिले आहे.

प्रधाने त्यांनी दिलेल्या उत्तरात यासाठी दिव्याच्या वातीचे उदाहरण दिले आहे. दिव्यामध्ये आपण कापसाची वात बनवतो. कापूस सछिद्र आहे. दिव्याची वात पेटवल्यावर दिवा तेवत राहण्यासाठी दिव्यातील तेल कॅपलरी इफेक्टने ज्योतीपर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे नारळाच्या झाडात असलेल्या अरुंद नलिकांमधून पाणी नारळापर्यंत आणि इतर झाडात सर्वात उंचावरील फांदीपर्यंत पोहचते.

झाडामध्ये झायलेम आणि फ्लोम नावाच्या नलिका असतात. त्यातून झाडातील सर्व भागात पाणी आणि अन्नघटक पोहचवले जातात. या अरुंद नलिका नळ्यांसारखे कार्य करतात, आणि याच अरुंद नळ्यांमधून पाणी झाडाच्या मूळांपासून वर चढते आणि वरच्या फांदीपर्यंत किंवा नारळापर्यंत येते. सूर्यप्रकाशाने बाष्पीभवन झालेल्या झाडाच्य़ा वरच्या भागातील पाणी किंवा आद्रता कमी होते. त्यामुळे कॅपलरी इफेक्टने वरपर्यंत आलेले पाणी या भागात खेचले जाते. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाविरोधात नारळापर्यंत पाणी पोहचण्यासाठी बाष्पीभवन आणि कॅपलरी इफेक्टची महत्त्वाची भूमिका असते.

आपली प्रतिक्रिया द्या