गुजरातमध्ये भाजपला सातवांचा दे धक्का, माजी आमदाराचा काँग्रेस प्रवेश

63

सामना प्रतिनिधी । हिंगोली

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार कुमार बावलिया यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मंत्री केल्यानंतर गुजरातचे काँग्रेस प्रभारी व हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी भाजपला दे धक्का देत हिशोब चुकता केला आहे. भाजपकडून तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार व गुजरातच्या सौराष्ट्र भागातील भाजपा जेष्ठ नेते कनुभाई कलासारिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार राजू सातव यांनी स्वतः ट्विटरद्वारे या पक्षप्रवेशाची माहिती दिली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भाजपचे नेते कनुभाई कलासारिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. कलासारिया यांच्या प्रवेशामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करून आगामी निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी मदत होणार असल्याचे खासदार राजीव सातव यांनी नमुद केले आहे. या प्रवेशाच्या वेळी खासदार राजीव सातव हेदेखील उपस्थित होते. गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, विरोधी पक्ष नेते परेश धनानी यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावत सातव यांनी मोदी- शहा यांच्या होम पीच मध्येच भाजपला सुरुंग लावण्यात यश मिळविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या