
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला असून तो आजपासून लागू झाला आहे. या नवीन टॅरिफमुळे हिंदुस्थान-अमेरिका व्यापारी संबंधांवर ताण पडला आहे. यातच जी परराष्ट्र सचिव आणि राज्यसभा खासदार हर्ष वर्धन श्रृंगला यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदुस्थान-अमेरिका दरम्यान लवकरच मुक्त व्यापार करार होणार, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. व्हर्जिनिया येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानकडून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर आपल्याला 50 टक्के कर भरावा लागेल. आम्ही त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी काम करत आहोत. आता पर्यायी बाजारपेठांचाही शोध घेतला जाईल. आमचा ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंग्डमसोबत मुक्त व्यापार करार आहे. आम्ही युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करार करण्याच्या जवळ आहोत. म्हणजेच आम्ही अनेक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतो.”
अमेरिकेच्या टॅरिफबद्दल बोलताना ते म्हणाले, “अमेरिकेसोबत आमचे सर्वात व्यापक आणि बहुआयामी संबंध आहेत, जे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. आशा आहे की, लवकरच अमेरिकेसोबत समाधानकारक मुक्त व्यापार करार होईल आणि ट्रम्प यांच्या हिंदुस्थान भेटीच्या पुढील टप्प्यात हे घडेल.”