
सामना प्रतिनिधी । बीड
मुर्शदपूर येथील रहिवासी मनोज मंगेश जोशी याची भारतीय वायुदलात ‘गरूड कमांडो’ म्हणून निवड झाली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण करतानाच मनोजने घेतलेली ही ‘गरूड’भरारी कौतुकाचा विषय ठरली आहे.
आष्टी येथील मनोजचे वडील मंगेश जोशी हे माजी सैनिक असून, त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीत २२ वर्षे देशसेवा बजावली. वडिलांप्रमाणेच सैन्यात नोकरी करण्याची मनोजची सुरुवातीपासून इच्छा होती. त्यासाठी शालेय जीवनापासून त्याने शरीर कमवायला सुरुवात केली. दीड वर्षापूर्वी त्याची हिंदुस्थानी स्थळसेनेत निवड झाली होती. परंतु तांत्रिक कारणाने त्याची ही संधी हुकली. तरीही नाउमेद न होता मनोजने तयारी सुरूच ठेवली. मागील वर्षी मे महिन्यात तासगाव (जि. सांगली) येथे झालेल्या भरती प्रक्रियेत त्याने पुन्हा नशीब अजमावले. त्यात सर्व शारीरिक व बौद्धिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊन चार दिवसांपूर्वी त्याला हिंदुस्थानी वायुसेनेत ‘गरूड कमांडो’ म्हणून निवड झाल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.
२८ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण
हिंदुस्थानी सैन्यात स्थळसेना, जलसेना व वायुसेना असे तीन विभाग आहेत. आपत्तीत बचाव कार्य व विशेष धाडसी मोहिमांसाठी गरूड कमांडोंची मदत घेतली जाते. दोन्ही दलांच्या तुलनेत वायुसेनेतील प्रशिक्षण जास्त कालावधीचे व खडतर असते. मनोज २२ जून रोजी प्रशिक्षणासाठी कर्नाटकमधील सांबरा (जि. बेळगाव) येथे रवाना होणार असून, हे प्रशिक्षण २८ महिने चालणार आहे.
नोकरी मिळेपर्यंत गोपालन!
मनोजने सैन्यात भरती होण्यासाठी एकीकडे प्रयत्न करतानाच दुसरीकडे दुग्ध व्यवसायही सुरू केला. विशेषतः देशी गाय पालनाला प्राधान्य दिले. या माध्यमातून स्वतःचा शैक्षणिक खर्च भागवून कुटुंबालाही हातभार लावला. देशी गायीचे दूध व जिममध्ये न जाता केलेला गावठी व्यायाम यामुळे चांगला फायदा झाल्याचे त्याने सांगितले.






























































