माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे निधन

1387

माजी मंत्री प्रभाकर मोरे (76) यांचे शनिवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुंबईच्या माजी नगरसेविका शीला मोरे, मुलगा अमित, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 10 वाजता महाड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रभाकर मोरे यांना वर्षभरापूर्वी पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी 10.30 च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मूळच्या महाड तालुक्यातील विन्हेरे येथील ताम्हाणे गावातील असलेल्या मोरे यांनी बेस्टच्या सेवेत लिपिक म्हणून नोकरीला लागल्यानंतर पुढे उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर ते आयटीसी टोबॅको कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून रुजू झाले. त्याचदरम्यान ते शिवसेनेच्या संपर्कात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर महाड-पोलादपूरच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. 1989 मध्ये ते महाडमधून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी या विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक मारली. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात ते गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्रीपद भूषविले. रायगड आणि कोल्हापूर जिह्यांचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. महाड-पोलादपूरमधील विकासकामांमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

आपली प्रतिक्रिया द्या