
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दररोज नवीन माहिती मिळत आहे. त्यातच आता पाकिस्तानी लष्कराच्या एका माजी मेजरने या दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानी लष्कराचे माजी मेजर आदिल राजा यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून करण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे.
एका वृत्तसंस्थेसोबत संवाद साधत असताना आदिल राजा यांनी पाकिस्तानची पोलखोल केली. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती चीन आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही दिली होती. त्यानंतर संशयाची सूई पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडे वळली होती.
दरम्यान माजी पाकिस्तानी मेजर आदिल राजा यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागील कारणही स्पष्ट केले. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पहलगाममधील पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला त्यांना आगामी झिया-उल-हक बनायचे आहे आणि त्यांनी त्यांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी हा हल्ला केला. लष्करप्रमुख दहशतवादी संघटनांना प्रोत्साहित करत आहेत जेणेकरून हिंदुस्तानवर मोठे हल्ले करता येतील,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.