मोहम्मद युनूस दहशतवाद्यांचा म्होरक्या, बांगलादेश अमेरिकेला विकण्याचा डाव! माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा घणाघाती आरोप

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दक्षिण आशियाई देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर देशाला अमेरिकेला विकण्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या अवामी लीग पक्षावरील अलिकडच्या बंदचा देखील निषेध केला आहे. हा बंद असंवैधानिक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांना 7 ऑगस्ट 2024 रोजी अंतरिम सरकारचे संक्रमणकालीन नेते म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सरकारविरुद्ध विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांमुळे तत्कालीन पंतप्रधान हसिना यांना राजीनामा देऊन बांगलादेशातून पळून जाण्यास भाग पाडले गेले होते.

हसीना यांनी केलेल्या दाव्यानुसार, सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळविलेल्या युनूसने सरकारची सूत्रे दहशतवाद्यांना दिली आहेत. ज्यांच्या विरोधात त्यांचे सरकार लढले. माझे वडील सेंट मार्टिन बेटासाठी अमेरिकेच्या मागण्या मान्य करत नव्हते. त्यासाठी त्यांना आपला जीव द्यावा लागला. आणि तेच माझे नशीब होते कारण सत्तेत राहण्यासाठी मी कधीही देश विकण्याचा विचार केला नव्हता,” असे यावेळी शेख हसीना म्हणाल्या.

बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांगलादेशी लोकांनी शस्त्रे उचलली आणि त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्यासोबत लढले होते. या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, या देशाच्या मातीचा एक इंचही कुणालाही देणे हा कोणाचाही हेतू असू शकत नाही. पण आज किती दुर्दैव आहे. अशी व्यक्ती सत्तेवर आता बसलेली आहे.

युनूसने अतिरेकी गटांच्या मदतीने बांगलादेशात सत्ता काबीज केल्याचा तिचा आरोप हसीनाने पुन्हा केला आहे. ”युनूसने दहशतवाद्यांच्या संगनमताने सत्ता काबीज केली आहे. अगदी विविध आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बंदी असलेल्यांच्या मदतीने, ज्यांच्याविरुद्ध माझ्या सरकारने बांगलादेशच्या लोकांना संरक्षण दिले. फक्त एका दहशतवादी हल्ल्यानंतर, आम्ही कठोर पावले उचलली. अनेकांना अटक करण्यात आली. आता तुरुंग रिकामे आहेत. त्यांनी सर्वांना सोडले. आता बांगलादेश त्या अतिरेक्यांचे राज्य आहे,” असेही हसीना म्हणाल्या.