
माजी रेल्वेमंत्री आणि पश्चिम बंगालच्या राजकारणाचे चाणक्य अशी उपाधी मिळालेले तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकुल रॉय हे गेल्या काही काळापासून आजारी होते. कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करत होते. ममता बॅनर्जी यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. टीएमसीचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले. यानंतर ते दिल्लीत पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून उदयास आले. 2006 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि 2009 ते 2012 त्यांनी राज्यसभेत टीएमसीचे नेते म्हणून काम पाहिले. यूपीए सरकारमध्ये त्यांनी जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणूनही काम केले. त्यानंतर मार्च 2012 मध्ये त्यांनी रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
Former Railway Minister and TMC leader Mukul Roy passed away at 1:30 am last night due to a cardiac arrest at Apollo Hospital in Salt Lake, Kolkata, his son Subhranshu Roy confirms.
(file pic) pic.twitter.com/LdjAMPXqAH
— ANI (@ANI) February 23, 2026
मुकुल रॉय यांचे नाव शारदा चिट फाउंडेशन घोटाळा आणि नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरण आले. यानंतर त्यांचे आणि पक्षातील अंतर वाढत गेले. अखेर 2017 मध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या, याचे सर्वाधिक श्रेय मुकुल रॉय यांना मिळाले.
दरम्यान, 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुकुल रॉय यांना भाजपकडून कृष्णनगर उत्तर येथून तिकीट मिळाले. या निवडणुकीत मुकुल रॉय यांचा विजयही झाला. मात्र ते फार काळ भाजपमध्ये रमले नाहीत. जून 2021 मध्ये त्यांनी घरवापसी केली. भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतरही टीएमसीमध्ये प्रवेश केल्याने कोलकाता उच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2025 मध्ये पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत त्यांना अपात्र ठरवले होते.


























































