सेल्फी काढताना माजी क्रिकेटपटूचा दरीत कोसळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक शेखर गवळी यांचा सेल्फी घेताना पाय घसरून खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परिसरात ही घटना घडली होती. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. शेखर गवळी यांच्या मृत्यूने नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडाविश्वाला धक्का बसला आहे.

शेखर गवळी हे महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि माजी रणजीपटू होते. प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे. ते आपल्या तीन मित्रांसमवेत इगतपुरीच्या हॉटेल गणाका मागे ट्रेकिंगसाठी आले होते. ट्रेकिंग सुरू असताना सेल्फी घेण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याने ते 250 फुट खोल दरीत पडल्याचं प्रशासनाने सांगितले आहे. शेखर गवळी ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी खोल दरी असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर ला पाचारण करण्यात आले होते. मात्र अंधार पडल्याने त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. अखेर रात्री शोधकार्य थांबवण्यात आलेले. बुधवारी ( दि.2 ) पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरू केले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास रेल्वे पुलाखालील एका पाण्याच्या डोहाच्या कडेला अडकलेल्या स्थितीत गवळी यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृतदेह ऊत्तर तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

शेखर गवळी हे 1997 ते 2004 पर्यंत महाराष्ट्र संघाकडून रणजी क्रिकेट खेळलेले आहे. रणजी क्रिकेटचा अनुभव बघता त्यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रेकिंगचे शौकीन असलेले शेखर गवळी नेहमी मित्रांसमवेत सायकलवरून ट्रेकिंगला जात असल्याचं त्यांनी सोशल मीडियाला यापूर्वी टाकलेल्या फोटोवरून स्पष्ट झालं आहे. या दुखद घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.