धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडले, इंडियन नॅशनल लोकदलप्रमुखांच्या फार्महाऊसमध्ये स्थलांतरित

आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास महिनाभराने जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. आज सायंकाळी ते उपराष्ट्रपतींचे निवासस्थान रिकामे करून दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख अभय सिंग चौटाला यांच्या फार्महाऊसमध्ये स्थलांतरित झाले.

धनखड यांना सरकारी बंगला देण्यात येत नाही तोपर्यंत ते खासगी फार्महाऊसमध्ये राहतील, असे अधिकाऱयांनी सांगितले. 21 जुलै रोजी राजीनामा दिल्यापासून 74 वर्षीय धनखड सार्वजनिकपणे समोर आलेले नाहीत. गेल्या महिन्यापासून ते उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानातच असून येथे ते त्यांच्या नातेवाईक आणि जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेत आहेत, असे एका सूत्राने सांगितले. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानातून बाहेर पडले. दरम्यान, चौटाला यांनी आमचे जुने काwटुंबिक संबंध आहेत, त्यांनी माझ्याकडे घर मागितले नव्हते तर मी त्यांना घर देऊ केले, असे सांगितले.