फॉर्म्युला वनचे स्ट्रिमिंग होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कार रेसिंगचे शौकीन प्रचंड आहेत. हिंदुस्थानात तर या कार रेसिंगचे बेफाट आकर्षण आहे. आता कार रेस शौकिनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फॉर्म्युला वन या विख्यात कार रेसिंगचे आता तुम्हाला लाइव्ह स्ट्रिमिंग बघता येणे शक्य होणार आहे. फॉर्म्युला वन आणि सध्याचा आघाडीचा ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र दोन्हीही कंपन्यांनी अद्याप यासंदर्भात काहीही अधिपृत घोषणा केलेली नाही. ही घोषणा सध्या न करण्यामागे बहुधा चिलीमधील रद्द झालेली कार रेसिंग स्पर्धा असावी, असा अंदाज लावला जात आहे.

एका वृत्तानुसार फॉर्म्युला वनच्या ओपनिंग डबल हेडर सीझनची सुरुवात सेंतियागो, चिली येथे 16 आणि 17 जानेवारीला होणार होती. मात्र कोरोनाच्या समोर आलेल्या नव्या प्रजातीच्या धोक्याकडे बघता सावधगिरीचा उपाय म्हणून या देशाने युनायटेड किंगडमला जोडून असलेल्या आपल्या साऱया सीमा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फॉर्म्युला ई टीम ही युकेस्थित असल्याने या टीमला आता प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे आपोआपच ही स्पर्धा रद्द झाली. आता या स्पर्धेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. त्यानंतरच या लाइव्ह स्ट्रिमिंगची गूड न्यूज प्रसारमाध्यमांपर्यंत पोचवण्यात येईल.

एका रिपोर्टनुसार गेल्या नऊ महिन्यांत कोरोना साथीच्या रोगामुळे फॉर्म्युला वन कार रेसिंगला तब्बल 363 मिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागलेले आहे; तर यामुळे फॉर्म्युला वनशी जोडलेल्या लिबर्टी मीडियाला आपल्या निम्म्या कर्मचाऱयांना कमी करावे लागले आणि त्यांना 1.4 बिलियन एवढी रक्कम रोख स्वरूपात पुरवावी लागली आहे. आता नव्या सीझनसाठी फॉर्म्युला वनने नव्याने कंबर कसली असून सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेल्या आणि कोरोनाकाळात प्रचंड वेगाने लोकप्रिय झालेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी हातमिळवणी करून पुन्हा एकदा फॉर्म्युला वन रेसिंगला लोकप्रियतेच्या शिखराकडे नेण्यासाठी ते उत्सुक झालेले दिसत आहेत.