
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यंदाच्या फॉर्च्यून बिझनेसमनच्या यादीत प्रथम स्थानावर आहेत. विषम परिस्थितीत काम करून कठीण लक्ष्य साधणाऱया जगभरातील 20 सीईओंना या यादीत स्थान देण्यात आले आहे. या यादीत नाडेला यांच्याशिवाय हिंदुस्थानी वंशाचे मास्टरकार्डचे सीईओ अजय बंगा (आठव्या) आणि अरिस्ताच्या प्रमुख जयश्री उलाल (18 व्या) स्थानावर आहेत.
सत्या नाडेला 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी विराजमान झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या महसुलात सतत वाढ होत राहिली. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये मायक्रोसॉफ्टचा नफा 39 अरब डॉलर आणि महसूल 126 अरब डॉलर इतका होता. तसेच कंपनीचा वार्षिक महसूलवाढीचा दर 11 टक्के आणि नफ्याचा दर 24 टक्के होता. एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट एक ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपवर पोहोचली होती. आतापर्यंत ऍपलसह जगातील चार कंपन्यानीच एवढी मजल मारली आहे.
मास्टरकार्डच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांनी तेजी
मास्टरकार्डच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांची तेजी झाली आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार अजय बंगा यांच्या कार्यकाळात मास्टरकार्डला नवीन ओळख मिळाली. तर जयश्री उलाल 2008 मध्ये अरिस्ताच्या सीईओपदी आल्या. त्यांच्या नेतृत्वात अरिस्ता ओपन सोर्स क्लाऊड सॉफ्टवेअरमध्ये स्पेशलाइज मार्केट लीडर बनल्या आहेत.


























































