एका पेपरसाठी 22 लाखांचा व्यवहार, सीईटी परीक्षा घोटाळा; 4 आरोपींना अटक

सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघड झाले असून गुण वाढवून देण्यासाठी एका पेपरसाठी 22 लाख रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार झाला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बिहार, ओदिशासारख्या दुसऱ्या राज्यातील सीईटी केंद्रे या वर्षी नाही तर पुढील वर्षी बंद केली जातील. त्यामुळे परीक्षा विस्कळीत होणार नाही, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विधान परिषदेत निवेदनाद्वारे चंद्रकांत पाटील यांनी दुपारच्या सत्रात सीईटीबद्दल निवेदन दिले. ते म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता सीईटी देणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रिया राबवली. नोंदणीवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून दिली.

स्पॅमकॉल आल्याने केली तक्रार

एमबीए, एमएमएस आणि अभियांत्रिकीच्या सीईटी परीक्षेत टक्केवारी वाढवून देण्यासाठी अर्जदारांना संपर्क साधण्यात येत होता. दोन विद्यार्थ्यांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून स्पॅमकॉल येत असल्याची तक्रार दिली. राज्य सरकारने त्यानंतर समिती नेमली तसेच उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अहवाल सादर झाला असून त्यात आर्थिक देवाणघेवाण झाली. शिवाय गुन्हेगार बिहार, उत्तर प्रदेशसारख्या परराज्यातील असल्याचे निदर्शनास आले. राज्य सरकारने या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. एका पेपरची टक्केवारी वाढवून देण्यासाठी 22 लाख घेतल्याचे समोर आले. देशभरात हे जाळे पसरले असून न्यायालयात याचिका दाखल केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भूलथापांना बळी पडू नका!

सीईटी देणाऱ्यांना हेरून काही व्यक्तींकडून अशा प्रकारचे संपर्क होत असतील तर अशा भूलथापांना, आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन करत परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याकरिता सीईटी कक्षामार्फत योग्य ती दक्षता घ्यावी, असे पाटील यांनी स्पष्ट केले.