
सामना प्रतिनिधी, मुंबई
देश-विदेशातील लाखो भाकिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराच्या दानपेटीत गुरुपौर्णिमेला तब्बल साडेचार कोटींचे दान जमा झाले आहे. रोख रक्कम, बँक चेक, ड्राफ्ट, सोने-चांदी आणि सतरा देशांतील परकीय चलनाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
गुरुपौर्णिमा, दसरा, रामनवमी हे तीन प्रमुख उत्सव साई संस्थानातर्फे दरवर्षी आयोजित केले जातात. या काळात भाविकांची संख्या मोठी असते. 15 ते 17 जुलै या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. या तीन दिवसांत साई मंदिर आणि परिसरातील दानपेट्या पैशांनी खचाखच भरल्या गेल्या. त्याची मोजणी गुरुवारी करण्यात आली. गुरुपौर्णिमा उत्सव काळात 4 कोटी 52 लाख रुपये देणगीरूपाने मिळाले.

























































