परभणीत सलग चार दिवस उष्णतेची लाट: पहिल्याच दिवशी पारा ४२.५ अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

गेल्या आठवडाभरापासून तापमान चाळीशीच्या घरात असले तरी गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ४२.५ अंशावर गेला आहे. हा पारा ४५ अंशांवर जाण्याची शक्यता हवामा खात्याने वर्तविली असून संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी अनेक उष्माघाताच्या घटना घडत आहेत.

परभणीतील नागरिकांनी सकाळी ११ ते ४ दरम्यान घराबाहेर पडणे धोक्याचे आहे, असा इशारा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान ही लाट आणखी चार दिवस राहण्याची शक्यता वनामकृविच्या कृषी हवामान विभागाने वर्तविली आहे. आज बुधवार, २४ रोजी तापमानाचा पारा कमाल ४२.५ तर किमान २३.७ अंशावर गेला आहे. तसेच मंगळवार, २३ रोजी ४१.५ तर किमान २१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या उष्णतेच्या लाटेने नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. हवामान खात्याने ४५ अंशांवर पारा जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानूसार परभणी जिल्ह्यात बुधवारी तापमानाचा पारा ४२.५ अंशावर गेला आहे. परिणामी तीव्र उन्हाचे चटके, सहन करावे लागत आहे. सकाळी ११ वाजेपासून रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला आहे. नागरिक सकाळी १० वाजेपर्यंतच सर्व कामे उरकुन घेत आहेत. एकीकडे उष्णतेची लाट परभणी शहरात आलेली असताना महानगरपालिका पंधरा दिवसआड पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. परभणी शहराला त्वरीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मनपा कधी दिलासा देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेमुळे पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. पशु व पक्षांना देखील पाणीटंचाईचा फटका बसत असून पाणी पिण्यासाठी अनेक वन्यप्राणी गावात येताना दिसून येत आहेत. परभणीत पारा ४२ अंशाच्यावर सरकत आहे. येत्या चार दिवसात हा पारा ४५ अंशावर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे सध्या परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी जीवघेणा सामना करत असताना सूर्य आग ओकत असल्याने दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचे भयावह चित्र उभे टाकले आहे. सार्वजनिक ठिकाणी उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी शितगृहे हाऊसफुल होत असताना दिसत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे भर दुपारी सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला आहे. भर दिवसा अघोषीत संचारबंदीच लागू झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी आजारांचे प्रमाण वाढले आहे. दवाखाने हाऊसफुल्ल होत आहेत.