
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत ठाणे पालिका हद्दीत तब्बल 4 लाख मतदार वाढले आहेत. ठाण्यात एकूण 16 लाख 49 हजार 867 मतदार असून प्रत्येक प्रभागात सुमारे दहा हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात असताना प्रारूप मतदार याद्यांची तपासणी करण्याचे मोठे आव्हान विरोधी पक्षाकडे आहे.
महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी निवडणुकीसाठी पालिका सज्ज झाल्या आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्याने गेल्या म्हणजेच 2017 सालाप्रमाणेच यंदाही 33 प्रभागच असणार आहेत. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. या प्रभागांची रचनाही पालिकेने काही दिवसांपूर्वीच अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान प्रारुप मतदार याद्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या याद्यांनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
16 लाख मतदाते
यंदाच्या निवडणुकीत एकूण 16 लाख 49 हजार 867 इतके मतदार आहेत. त्यात 8 लाख 63 हजार 878 पुरुष, 7 लाख 85 हजार 830 महिला, 158 इतर मतदार आहेत. तर, 2017 मध्ये एकूण मतदारांची संख्या 12 लाख 28 हजार 606 इतकी होती. त्यात 6 लाख 67 हजार 504 पुरुष तर 5 लाख 61 हजार 87 महिला आणि 15 इतर मतदारांचा समावेश होता. यामध्ये महिला 2 लाख तर पुरुषांच्या संख्येत 2 लाख मतदारांची भर पडली आहे.



























































