कर्नाटकातील काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या गळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला शुक्रवारी गैरहजर राहिलेल्या पक्षाच्या चार आमदारांचे ‘दर्शन’ शनिवारीही कोणाला घडले नाही. त्यामुळे ते चौघे भाजपच्या गळाला लागल्याचे मानले जात असून काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीच्या सरकारसमोरील संकट कायम आहे. दरम्यान, सरकारपुढील संकटावर तोडगा शोधण्यासाठी काँग्रेसची आजही एक बैठक झाली. पक्षाच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असून त्यावर बैठकीत चर्चा झाली.

चार आमदारांना नोटिसा
आमदारांच्या एकजुटीचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला मंत्रिमंडळाच्या फेरबदलात डच्चू देण्यात आलेले रमेश जर्कीहोली, बी. नागेंद्र, उमेश जाधव, महेश कुमाताहाली या चार आमदारांनी ‘दांडी’ मारली होती. त्याबद्दल काँग्रेसने त्यांना आज नोटीस बजावली असून आपणावर पक्षांतर विरोधी कायद्याखाली कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल करण्यात आला आहे. माजी मंत्री जर्कीहोली यांनी दिल्ली- मुंबई जाऊन भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. पण त्यावर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही. त्याबद्दल जर्कीहोली यांना काँग्रेस विधिमंडळ नेते सिद्धरामय्या यांना जाब विचारला आहे.

लोकसभा निवडणुकीत खरगेंविरोधात उमेश जाधव?
आमदार उमेश जाधव हे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला तांत्रिक कारण देऊन अनुपस्थित राहिले. मात्र जाधव हे भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. भाजप त्यांना कलबुर्गी लोकसभा मतदारसंघातून मल्लिकार्जुन खरगेंविरुद्ध उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.

आमदाराच्या शिरावर फोडली आमदारानेच दारूची बॉटल
काँग्रेसने आपले आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत, यासाठी त्यांना एका रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठेवले आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत चाललेल्या त्यांच्या ‘पार्टी’मध्ये आमदार आनंद सिंग यांच्या डोक्यावर आमदार जे. एन. गणेश यांनी दारूची बॉटलच मारली. त्यामुळे जखमी झालेल्या आनंद सिंग यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यांच्यामुळेच फसले, असा आरोप आनंद सिंग यांनी केल्यामुळे गणेश भडकले होते. दरम्यान, भाजपचेही कर्नाटकातील आमदार गेले काही दिवस गुरूग्राम येथील रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते. त्यांना परत येण्याचा आदेश भाजप नेते बी. एस. येडियूरप्पा यांनी दिल्यानंतर भाजपचे 104 आमदार काल बंगळुरूत दाखल झालेत.