रस्तालूट करणारी चौघांची टोळी जेरबंद ; नगर ’एलसीबी’ची कारवाई

39

सामना प्रतिनिधी । नगर

इमामपूर घाटात वाहन चालकांना लुटणार्‍या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. इतर दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. तसेच चोरट्यांकडून गुन्ह्यात चोरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये परशुराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड (वय- 19 वर्षे, रा. एकनाथवाडी, ता- पाथर्डी, जि- नगर), ईस्माइल अमीर शेख (वय- 35 वर्षे, रा. संजयनगर, गेवराई, जि. बीड), तुकाराम अशोक पांचाळ (वय- 29 वर्षे, रा. पैठण, ता- केज, जि- बीड), रामेश्वर प्रल्हाद लाटे (वय- 35 वर्षे, रा. ग्रामसेवक कॉलनी, बीड) यांचा समावेश आहे.

कृष्णात मारुती कणसे 24 मे 2019 रोजी हुंडाई क्रेटाने औरंगाबाद-नगर रोडने सातारा येथे जात असताना सायंकाळी 7.15 वाजता ईमामपूर घाटाच्या दुसऱ्या वळणावर आले पोहचल्यावर पाठीमागून सफेद रंगाच्या इंडीका कारमधून आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांची कार अडवली. आमच्या गाडीला कट का मारला, अशी विचारणा करत दगडाने कारच्या काचा फोडल्या. तसेच कणसे यांना मारहाण करुन त्यांची हुंडाई क्रेटा कार, गोल्डन फ्रेमचा गॉगल, व अ‍ॅपल आयफोन असा एकूण 10,35,000 किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समांतर तपास करत होते. पथकातील सुनिल चव्हाण यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, सुमारे तीन आठवड्यांपुर्वी एमआयडीसी हद्दीमध्ये असणार्‍या पांढरी पुल येथून क्रेटा कार चोरी झालेली असून चोरी करणारे इसम सदर कारसह बीड जिल्ह्यातील कालिकानगर भागात चोरी केलेल्या कारला एमएच-12-पीएन-9955 हा बनावट क्रमांक लावून फिरत आहेत.

पोलिसांनी बीडमध्ये जाऊन कालिकानगर परिसरात सापळा लावून कार नं. एमएच-12-पीएन-9955 ला घेराव घालून कारमध्ये असलेल्या व्यक्तीची चौकशी केली. त्यांना गाडीचे कागदपत्रांबबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता परशूराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड याने सांगीतले की, महिन्यापूर्वी मी व माझे साथीदार तसेच गणेश मोतीराम गायकवाड (रा. ग्रामसेवक कॉलनी, बीड) भिमा सादू लवांडे (रा. सदर) यांनी मिळून माझे दाजी दत्ता श्रीमंत जाधव यांचे मालकीचे इंडीका व्हीस्टा कारने अहमदनगर ते औरंगाबाद हायवे रोडवरील क्रेटा कारचा नेवासा फाटा येथून पाटलाग करुन ईमामपूर घाटामध्ये क्रेटा कारला कट मारुन कार थांबवून ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाजाची काच दगडाने फोडून क्रेटा कार चालकाला बाहेर मारहाण केली. त्यानंतर त्याची कार बळजबरीने चोरुन नगरचे दिशेने निघालो. पुढे टोलनाका असल्याची माहीती मिळाल्याने क्रेटा कार मागे वळवून पुन्हा संभाजीनगरच्या दिशेने एका ट्रकच्या मदतीने मिरी रोडने तीसगाव पाथर्डी मार्गे बीडला आल्याचे सांगितले. क्रेटा कारची ओळख पटू नये म्हणून क्रेटा कारला दुस-या क्रेटा कारची एमएच-12-पीएन-9955 ही बनावट नंबर प्लेट लावून कार आम्ही वापरत असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या