
सामना प्रतिनिधी । राहुरी
वांबोरी गावात एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोड्या करून लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वांबोरी येथे गुरूवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत भरवस्तीतील चार घरे फोडून लाखभर रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वांबोरी गावातील नगरवेस व माळी गल्लीत चोरीच्या घटना घडल्या.
नगरवेस येथील रघुनाथ हौशीराम जाधव यांच्या घराचा कडीकोयंडा लोखंडी कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची उचकापाचक करताना 66 हजार रूपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. त्यानंतर चोरट्यांनी कस्तुरी सुरासे व रवी चेष्टाने यांच्या घराकडे मोर्चा वळविला. कटावणीच्या सहाय्याने दरवाजा उचकटुन चोरटे घरात शिरले. घरातील 15 हजार रूपयांची रोकड व सोन्याचे मंगळसूत्र चोरून त्यांनी पोबारा केला. त्यानंतर जवळच असलेल्या जुबेर शेख यांचे घर फोडण्याच्या प्रयत्न चोरट्यांनी केला.मात्र, घरातील मंडळी जागी झाल्याचा सुगावा लागल्याने चोरटे पसार झाले. वांबोरी गावात पहाटेच्या वेळात चोरीच्या घडत असताना संबंधीत घरमालक साखर झोपेत होते. सकाळी चोरट्यांनी घरे फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची खबर गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ, पोलीस कॉन्सटेबल शैलेश सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरांची पाहणी करत ठसेतज्ञ तसेच पोलीस श्वान पथकाला वांबोरीत बोलावले. श्वान पथकाने घटनास्थळ ते वांबोरी डाक बंगला असा तीन किलोमीटरपर्यंत माग काढला. पांढरीपूल रस्त्यावर श्वान थबकल्याने चोरटे या दिशेने पसार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस कॉन्सटेबल शैलेश सरोदे करीत आहेत.






























































