तारकर्लिच्या समुद्रात कागलचे चौघे बुडाले, एकजण बेपत्ता; तिघांना वाचविण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कागल तालुक्यातील मुरगूड येथील एका खासगी क्लासचे विद्यार्थी तारकर्ली येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात पोहताना चार विद्यार्थी बुडाले. यामध्ये तिघांना वाचविण्यात यश आले, तर एकजण अद्यापि बेपत्ता आहे.

आदित्य पाटील (वय 21, रा. बस्तवडे, ता. कागल) असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव आहे. अजिंक्य पाटील (वय 21, रा. कविलगे), प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे (रा. कविलगे, ता. कागल) या तिघांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या आदित्यचा स्थानिक मच्छीमार व स्कूबा डायव्हर यांच्या माध्यमातून उशिरापर्यंत शोध सुरू होता.

मुरगूड येथील सायबर कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूट या संगणक प्रशिक्षण देणाऱया संस्थेचे वीस विद्यार्थी सहलीसाठी कुणकेश्वर येथे आले होते. कुणकेश्वर येथून सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान ते तारकर्ली एमटीडीसी येथील समुद्रावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. यातील आठ जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य पाटील हा बुडून बेपत्ता झाला, तर त्याच्यासोबत असलेले अजिंक्य पाटील, प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी समुद्रात धाव घेत या तिघांना वाचवून किनाऱयावर आणले.

यामध्ये अजिंक्य पाटील याची प्रकृती खालावल्याने त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार चालू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. स्वप्नील दळवी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, महादेव घागरे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.