मंचर – ऊसाच्या शेतातील कोल्ह्याच्या 5 पिल्लांना मिळालं जीवदान, रेस्क्यू टीमचे प्रयत्न यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंचर वनक्षेत्रात रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांमुळे आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे कोल्ह्याच्या पाच पिल्लांना जीवदान मिळाले आहे. या पथकामुळे पिल्ल्यांची आईसोबत भेट झाली.

लाखणगावमधील पाचर्णे वस्तीवरील रामदास दगडू शेजवळ यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना शेतात कोल्ह्याची पाच पिल्ले ऊसतोड कामगारांना आढळूनली होती. त्यानंतर ही माहिती विजय कानसकर, दत्तात्रय राजगुरव यांनी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस आणि वनरक्षक साईमाला गिते यांना देण्यात आली. रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत सर्व पिल्ले एका प्लॅस्टिकच्या घमेल्यात ऊसाच्या पाचरटात सुरक्षित ठेवली.

ऊस तोडणी बंद झाल्यानंतर कामगार निघून गेले आणि त्यानंतर पिल्लांच्या आईने एक पिल्लू उचलून सुरक्षित ठिकाणी नेले. उरलेल्या पिल्लांसाठी ती पुन्हा येईल म्हणून त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आला. मात्र सायंकाळपर्यंत पिल्लांची आई तिकडे फिरकली नाही. अखेर सायंकाळनंतर तिने एक-एक करत पिल्ला उचलली आणि सुरक्षित ठिकाणी नेली. हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला.