
फिटनेसच्या क्षेत्रात मोठे नाव असलेल्या ‘तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस’शी संबंधित आठ संचालक अडचणीत सापडले आहेत. त्या संचालकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली आहे. दोन बँकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तळवलकर्सविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
2016 ते 2019 या कालावधीत 180 कोटी रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार लक्ष्मी विलास बँकेचे उपाध्यक्ष पनीरसेल्वम ए. यांनी केली आहे. या तक्रारीवरून तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि., तळवलकर्स हेल्थ क्लब लि. तसेच त्याच्या आठ संचालकांविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोटय़वधींची फसवणूक असल्याने या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याआधी गेल्या आठवडय़ात ऑक्सिस बँकेची 206 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही प्रकरणांतील आरोपी देश सोडून जाऊ नयेत यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱयाने सांगितले.




























































